Published On : Thu, Jun 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या विकासाला नवी भरारी,आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार गेमचेंजर; नितीन गडकरींचे विधान

Advertisement

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासात गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. विमानतळाचे हस्तांतरण जीएमआर एरो कंपनीकडे करण्यात आले असून, या निर्णयामुळे नागपूरला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे नवे केंद्र बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यटन, उद्योग, खाणकाम, कृषी निर्यात आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

हस्तांतरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी नागपूरच्या वाढत्या क्षमतेवर प्रकाश टाकला. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नागपूर हे आधीच लॉजिस्टिक हब म्हणून वेगाने पुढे येत असून, आता आधुनिक विमानतळामुळे त्याची ताकद आणखी वाढणार आहे. ताडोबा, पेंच आणि उमरेडसारख्या वन्यजीव पर्यटन स्थळांमुळे परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल, तर विदर्भातील खनिज संपत्ती आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

नागपूरला दुबई आणि सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांशी थेट हवाई सेवा सुरू करण्याची गरजही त्यांनी यावेळी मांडली. नागपूरच्या प्रसिद्ध संत्र्यांची ओळख जगभर पोहोचावी यासाठी विमानतळावर संत्रा बर्फीचे स्टॉल उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.

Advertisement

केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जीएमआरच्या माध्यमातून विमानतळाचा विस्तार झाल्यानंतर वार्षिक प्रवासी क्षमता ६० लाखांहून अधिक होईल. कार्गो हब, एमआरओ सुविधा आणि आधुनिक पायाभूत विकासामुळे नागपूर हे ‘एरोट्रोपोलिस’ म्हणून देशाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला भविष्यातील ‘डिफेन्स एव्हिएशन हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसऱ्या धावपट्टीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत वाढ होईल तसेच संरक्षण आणि विमान उद्योगातील मोठ्या गुंतवणुकीचे दरवाजे उघडतील, असे ते म्हणाले.

नागपूर विमानतळाचे जीएमआरकडे झालेले हस्तांतरण हे केवळ व्यवस्थापनातील बदल नसून, विदर्भाच्या आर्थिक प्रगतीला गती देणारे आणि नागपूरला जागतिक हवाई नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारे पाऊल मानले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.