Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 5th, 2018

  न्यू मनीषनगर-गांधीबाग ‘आपली बस’चा शुभारंभ

  नागपूर : न्यू सोमलवाडा, न्यू मनीषनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने मंगळवार ५ जूनपासून न्यू मनीषनगर-गांधीबाग ‘आपली बस’चा शुभारंभ केला.

  यानिमित्त श्यामनगर येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, नगरसेविका विशाखा बांते, जयश्री वाडीभस्मे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी, श्री. पाठक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, नागपूर शहरातील ‘आपली बस’ अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. नागरिक मागेल त्या मार्गावर बस देण्याचा आमचा मानस आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची मानसिकता आता बनत आहे. यापूर्वी न्यू मनीषनगर-बर्डी बस सुरू केली. आता गांधीबाग मार्गावर बस सुरू झाल्याने मनीषनगर दोन मुख्य भागांशी जोडले गेले. या दोन्ही मार्गावरील बसचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  नगरसेवक अविनाश ठाकरे यांनीही नागरिकांना मनपाच्या ‘आपली बस’चा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन केले. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कामडी यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून बसचा शुभारंभ केला. यावेळी परिवहन नियंत्रक योगेश लुंगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव प्रा. अरुण फाळके, सहसचिव रामचंद्र चुटे, कार्याध्यक्ष रामकुपाल तिवारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक गुंडावार यांच्यासह अन्य सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे संचालन अशोक कातुरे यांनी केले. सदर बसचा मार्ग न्यू मनीषनगर बस स्टॉप, श्यामनगर, काचोरे लॉन, बेसा टी-पॉईंट, रामेश्वरी चौक, विश्वकर्मा नगर, तुकडोजी पुतळा, मेडिकल चौक, बस स्टॅण्ड, टिळक पुतळा, बडकस चौक, गांधी पुतळा असा राहील. न्यू मनीषनगर येथून सकाळी ८ वाजता पहिली फेरी आणि सायंकाळी ५.३० वाजता अखेरीची बस राहील. गांधीबाग येथून सकाळी ९ वाजता पहिली बस तर सायंकाळी ६.३० वाजता अखेरची बस राहील. एका तासाच्या अंतराने बसफेऱ्या राहतील.

  बस शुभारंभ कार्यक्रमानंतर नागपूर महानगरपालिका आणि स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने श्यामनगर परिसरात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वृक्ष लावून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145