
नागपूर : न्यू कामठी परिसरात सरकारी जागेचा वापर करून सुरू असलेल्या कथित गोवंशीय मांस विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. न्यू कामठी पोलिस, महसूल विभाग आणि कामठी नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अनधिकृत दुकान पाडले.
सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळील भिंतीलगत अतिक्रमण करून हे बांधकाम उभारण्यात आले होते. या ठिकाणी कथितरित्या गोवंशीय मांसाची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी महसूल प्रशासनाशी संपर्क साधून कारवाईसाठी पुढाकार घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुनकर कॉलनीतील रशीद कमाल आणि शहबाज कमाल यांचा या दुकानाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. कथित गोवंशीय मांस विक्रीच्या आरोपावरून या दोघांविरोधात न्यू कामठी पोलिस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
तक्रारीनंतर तहसीलदार गणेश जगताप यांच्या निर्देशानुसार महसूल विभाग, नगरपरिषद आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
दरम्यान, कामठी परिसरात यापूर्वीही कथित गोहत्या आणि गोवंशीय मांस विक्रीविरोधात कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे या कारवाईकडे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना दिलेला स्पष्ट इशारा म्हणून पाहिले जात आहे.
न्यू कामठी पोलिसांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवू दिला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिला.




