नागपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन जीएसटी सुधारणा विधेयक हे देशाच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असून सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे, असे मत भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राउत यांनी व्यक्त केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे यासाठी आभार मानले.
२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटी करप्रणालीत ५%, १२%, १८% आणि २८% असे चार स्लॅब होते. मात्र नव्या सुधारणेनुसार १२% आणि २८% हे स्लॅब रद्द करून केवळ ५% आणि १८% असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. यामुळे वस्तू व सेवांचे वर्गीकरण सुलभ होणार असून करप्रणालीत मोठा बदल घडून येणार आहे.
या सुधारणेमुळे दैनंदिन वापरातील वस्तू – तूप, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, साबण, शॅम्पू यांसह अनेक आवश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरावरील खर्च कमी होऊन सर्वसामान्यांचा भार हलका होईल. शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या काही साहित्य व उपकरणांवरील जीएसटी घटल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, तसेच नफा वाढण्याची शक्यता निर्माण होईल.
“या सुधारणा केवळ करसुलभीकरणापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणाऱ्या आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेच्या खिशाला दिलासा देणाऱ्या या सुधारणांमुळे सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीयांचा विश्वास सरकारवर आणखी दृढ झाला आहे,” असे आनंदराव राउत यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत भाजप महामंत्री अनिल निधान, राहुल किरपान, रिंकेश चवरे आणि शुभांगीताई गायधने यांचीही उपस्थिती होती. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा अभियान’ अंतर्गत या सुधारणा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.