नागपूर : नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच नागपूरला तिसरी वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे आणि यंदा ही गाडी पुणे मार्गावर धावणार आहे. विशेष म्हणजे ही वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोच असलेली असेल, जी प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात अधिक आरामदायक सुविधा देणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच जाहीर होऊ शकते. या नव्या ट्रेनमुळे नागपूर ते पुणे या सुमारे ९४० किमीच्या अंतरासाठी केवळ १२ तास लागणार आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना १४ ते १७ तासांचा कालावधी लागतो.
ही नवी स्लीपर वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहे. प्रवाशांसाठी आरामदायक शयनव्यवस्था, आधुनिक स्वच्छतागृहे, एलईडी लाईट्स, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असेल. या सेवेचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना, व्यावसायिक प्रवाशांना आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना होणार आहे, कारण हे सर्व नागपूर-पुणे मार्गावर वारंवार प्रवास करतात.
रेल्वे मंत्रालयाच्या योजनेनुसार, लवकरच देशभरात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार असून नागपूर-पुणे मार्ग त्यात समाविष्ट आहे. नागपूरच्या अजनी स्थानकावरून ही गाडी निघणार असून सुमारे १२ तासात पुणे गाठणार आहे. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची ही सुविधा प्रवाशांसाठी एक नवा अनुभव ठरणार आहे.