Published On : Fri, Oct 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यात नवा अध्याय सुरू,८० हजार महिलांसाठी ‘नवसखी उद्योगिनी योजना’; महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी आणि उद्योजकतेच्या मार्गावर नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. ‘नवसखी उद्योगिनी योजना’ या नव्या योजनेचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेद्वारे ८० हजार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १,६०० महिला बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीजभांडवल देण्यात आले आहे. यामुळे महिलांना छोट्या-मोठ्या उद्योगांद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल, असे सांगण्यात आले.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंत्री बावनकुळे म्हणाले, “नवसखी उद्योगिनी योजना ही केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर महिलांना रोजगार आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारी विकास योजना आहे. पूर्वी जिल्हा खनिज फाउंडेशनचा निधी रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा अशा मूलभूत कामांसाठी वापरला जात असे. पण आता त्याच निधीतून महिलांसाठी उद्योग संधी निर्माण करून त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला जात आहे.”

या योजनेअंतर्गत ‘उमेद’ संस्थेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यात येणार आहे. ८,००० स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार महिलांना सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार आशिष देशमुख, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आणि माजी आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, “पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ८० हजार महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे आमचे ध्येय आहे. सध्या १,६०० गटांतील १६,००० महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, ही फक्त सुरुवात आहे.”

बावनकुळे यांनी योजनेला महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरवले असून, “ही योजना महिला उद्योजकतेचा आदर्श नमुना बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement