नागपूर : शहरात गुंडाची टोळी चालवणारा मोक्काचा आरोपी कुख्यात सुमीत ठाकूरविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीम संचालकाला सुमीत ठाकूरने जीवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून फरार आरोपी सुमीतचा शोध घेण्यास सुरुवात केली.
माहितीनुसार, फिर्यादी गणेश उर्फ गुही चाचेरकर हे गोरेवाडा जुनी वस्ती येथे जीम चालवतात. त्यांच्या जीममध्ये अत्याधुनिक यंत्रणे असल्याने अनेक युवक त्याच्या जीममध्ये येत असतात. त्यामुळे सुमीतने १ नोव्हेंबरला गणेश गोरेवाडा फॉरेस्ट गेटजवळ असताना गणेशला ५० हजार रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी गणेशने सुमितला ५० हजार रुपये दिले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागणार असा दम सुमितने गणेशला दिला. गणेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुमित विरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. गिट्टीखदानशिवाय गुन्हे शाखा आणि इतरही पोलीस ठाण्याचे पथक सुमितचा शोध घेत असून याप्रकरणी तापस सुरु केला आहे.
सुमीत ठाकूर (३८) फ्रेंड्स कॉलनी येथे राहतो . हा गेल्या अनेक दिवसांपासून गुंडाची टोळी चालवितो. तसेच लोकांना धमकी देत वसुलीही करतो. नुकतेच त्याने जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत एका युवकाला पिस्तुलचा धाक दाखवून अपहरण करून लुटमार केली. त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाची जवळपास २० गुन्हे दखल करण्यात आले आहे.