नागपूर : शहरात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. धंतोली परिसराताल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लकव्याने ग्रस्त असलेल्या ७७ वर्षाच्या वृद्ध महिलेवर एका युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी युवकाला धंतोली पोलिसांनी अटक केली असून दीपक विजय ठाकरे (वय ३९,रा. माटे चौक, गोपालनगर असे त्याचे नाव आहे.
आरोपी दीपक हा वृद्धेच्या मुलाचा मित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी महिलेला लकवा मारल्याने त्यांना धंतोलीतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिचा मुलगा तिची काळजी घेत होता. आरोपी दीपक त्याच्यासोबत आठ ते नऊ वर्षांपासून काम करीत असल्याने तो त्याचा चांगला मित्र होता. त्यामुळे तोही रुग्णालयात त्याच्यासोबत होता. त्यानुसार दीपक बुधवारी मित्राच्या आईला रुग्णालयात भेटायला गेला होता. तो येताच औषधी आणण्यासाठी आणि काही कामे आटोपून येतपर्यंत आईची काळजी घेण्यास दीपकला सांगितले. त्यामुळे दीपकने दार लावून घेतले. दरम्यान त्याची आई बेशुद्ध अवस्थेत असताना दीपकने तिच्यावर अत्याचार केला.
याचदरम्यान हॉस्पिटलमधील परिचारिका वृद्धेला औषध देण्यासाठी आली असता तिला हा प्रकार दिसून आला. हे कृत्य पाहताच परिचारिकेने आरडा-ओरड केल्यानंतर अन्य कर्मचारी खोलीत आले. त्यांनी दीपकला चांगलेच बदडून काढले. दरम्यान हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरुन धंतोली पोलिसांनी दीपकला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.