
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दिलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. खरगे यांनी स्पष्टपणे म्हटलं की, त्यांच्या वैयक्तिक मतानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालणं आवश्यक आहे, कारण देशातील अनेक कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या आणि सामाजिक तणावाचे मूळ भाजप-आरएसएसमध्येच आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी 1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर केलेल्या कठोर भाष्याचा उल्लेख करत म्हटलं, “आज ज्या संघटनेचा उल्लेख देशभक्त म्हणून केला जातो, त्याच संघटनेवर कधी देशातील तणाव वाढवल्याचा आरोप झाला होता.”
खरगे पुढे म्हणाले, “हे माझं वैयक्तिक मत असलं तरी मला वाटतं की, देशातील बहुतेक समस्या, कायदा-सुव्यवस्थेतील अडचणी या आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीमुळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा संघटनांवर सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.”
त्यांनी आणखी एका मुद्द्यावर प्रकाश टाकला – सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्या नात्याबाबत भाजप लोकांना चुकीचं चित्र दाखवतो, पण प्रत्यक्षात दोघांमध्ये परस्पर आदर होता. “नेहरूंनी नेहमीच पटेलांच्या राष्ट्रीय एकतेसाठी केलेल्या कार्याचं कौतुक केलं, तर पटेल यांनी नेहरूंना आदर्श नेता म्हटलं होतं,” असं खरगे यांनी सांगितलं.
यावेळी खरगे यांनी सरदार पटेल यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या त्या प्रसिद्ध पत्राचाही उल्लेख केला, ज्यात पटेल यांनी म्हटलं होतं की, संघाने असं वातावरण तयार केलं होतं ज्यामुळे महात्मा गांधींची शोकांतिका घडली.
खरगे म्हणाले, आज आपण एका बाजूला ‘लोहपुरुष’ सरदार पटेल यांची जयंती साजरी करतो, तर दुसऱ्या बाजूला ‘लोहपुरुषी’ इंदिरा गांधींची पुण्यतिथी साजरी करतो. या दोघांनीही देशाच्या एकतेसाठी आपलं आयुष्य वाहिलं, पण आज काही शक्ती त्याच एकतेला तडा देण्याचं काम करत आहेत.








