Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

युवकांमध्ये पर्यावरण सजगता रुजवणे काळाची गरज; नागपुरातील ‘प्लॅस्टिकमुक्त किचन’ परिसंवादात मान्यवरांचे मत

Advertisement

नागपूर– आजच्या तरुण पिढीला केवळ शिक्षण देणे पुरेसे नाही, तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जबाबदारीही रुजवणे अत्यावश्यक आहे, असा ठाम संदेश मान्यवरांनी दिला.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी ‘प्लॅस्टिकमुक्त किचन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट आणि श्री संताजी शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमात मास्टर शेफ अजिंक्य गंधे आणि विक्रम गंधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवत प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली.

संताजी महाविद्यालयाचा परिसर पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त असल्याचे प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी यांनी सांगितले. दैनंदिन जीवनात लहान बदल करून प्लॅस्टिकचा वापर कमी करता येतो, असे विक्रम गंधे यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या ‘मास्टर शेफ’मधील अनुभवांवरही प्रकाश टाकला.

Advertisement

अजिंक्य गंधे यांनी स्वयंपाकघरातील कचऱ्याचा पुनर्वापर कसा करता येतो याबाबत मार्गदर्शन केले. फळे-भाज्यांच्या साली व उरलेल्या पदार्थांचे डिहायड्रेशन करून त्याचा उपयोग करता येतो, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ‘मास्टर शेफ’च्या सेटवरही प्लॅस्टिकचा वापर टाळण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्लॅस्टिकमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यासोबतच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटकडून वर्षभर विविध जनजागृती उपक्रम राबविले जात असल्याची माहिती अध्यक्षा ज्योत्स्ना पंडित यांनी दिली. पुढेही आरोग्यदायी व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार सुरूच ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाखा पवार आणि स्वाती वाकोडे यांनी मानले. या उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर संस्थांचे सहकार्य लाभले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.