Published On : Sat, Aug 28th, 2021

प्रदूषण कमी करण्यासाठी जनसहभागाची गरज – नितीन गडकरी

Advertisement

– ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या ‘ध्वनी प्रदूषण जागरुकता अभियाना’चे उद्घाटन

नागपुर : ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत असून त्यावर मात करण्यासाठी जनसहभागाची नितांत गरज आहे. जनता, सामाजिक संस्था, उद्योग, वेस्ट टू वेल्थ इत्यादीच्या सहकार्याने आपण आपले पर्यावरण पुढील पाच वर्षात आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या ध्वनी प्रदूषण जागरुकता अभियानाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला नितीन मुणोत, विश्वास सहस्त्रभोजनी, मनिष वझलवार, अनिरूद्ध भांडारकर, प्रविण बावनकुळे, विवेक गर्गे, सुभाष कासनगोट्टीवार, विजय अग्रवाल यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाड्यांच्या कर्णकर्कश्श हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. परिवहन खात्यामध्ये हॉर्नच्या आवाजासंदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले आहे. त्यावर बराच विचार केल्यानंतर हॉर्नचे आवाज मंजूळ करून त्यात भारतीय वाद्यांचा उपयोग कसा करता येईल आणि त्यांची फ्रीक्वेन्सी कमी कशी राखता यांसदर्भात कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भविष्यात इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर, कार यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांच्या किंमत कमी होतील आणि पेट्रोल, डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होईल. ग्रीन हायड्रोजनसंदर्भात धोरण तयार केले जात असून त्यामाध्यमातून जलप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
ध्वनी प्रदूषणासंदर्भात ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनने सुरू केलेल्या मोहिमेचे कौतूक करताना गडकरी यांनी ही चळवळ गाव, शहर, राज्य आणि देशपातळीवरही राबवण्याचे आवाहन केले.

एम्सच्या महावृक्षारोपण कार्यक्रमात नितीनजींनी ध्वनी प्रदूषणावर काम करायचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनने ही मोहिम चालू केली आहे. याआधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनतेला ध्वनी प्रदूषणासंदर्भात स्लोगन पाठविण्याचे आवाहन केले. मोहिमेचा पुढील टप्पा येत्या, 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असून या टप्प्यात जनजागृतीसाठी गाड्यावर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे स्टीकर लावण्यात येणार आहेत, असे प्रा. अनिल सोले म्हणाले.

कार्यक्रमाला कौस्तुभ चॅटर्जी, विजय घुगे, योगेश बन, भोलानाथ सहारे, आशीष वांदिले, चेतन कायरकर, बंटी मेश्राम, प्रशांत कामडे, प्रवीण बावनकुळे, अनुप खंडेलवाल यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.