नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिले आहेत. आजच या दोघांकडून एनडीएचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांमध्ये समोर आलेल्या वृत्तांनुसार, जगदीप धनखड हे राजस्थानमधील जाट समाजातील होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या समाजात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तराधिकारी म्हणून पुन्हा जाट समाजातील व्यक्तीला संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे नाव अग्रस्थानी आहे. देवव्रत हे हरयाणातील असून जाट समाजाशी त्यांचा संबंध आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनुसार २१ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, तर ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत, ज्यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी होते, पंतप्रधान मोदी आणि जे. पी. नड्डा यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते. या बैठकीला एनडीएमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.