
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पक्ष आणि सरकार पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवली आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, अर्थमंत्रिपद वगळता इतर तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येत भाजपला थेट आव्हान देत होते, मात्र अपेक्षित यश राष्ट्रवादीला मिळू शकले नाही.
अशातच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राष्ट्रवादी ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज दुपारी ३ ते ५ या वेळेत महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, त्यामुळे भाजपचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.








