राज्यातील पत्रकार मित्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे साधला संवाद…
केंद्रातील असहकार्याबद्दल व्यक्त केली नाराजी ;भाजप फक्त राजकारणाला प्राधान्य देते…
हातात सत्ता नसल्याने काही लोक सध्या अस्वस्थ आहेत. त्या नैराश्यपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग चालवत आहेत…
मुंबई दि. १९ एप्रिल – कोरोनाविरोधातील लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी युवक, महिला, युवती काँग्रेस, विविध सेलचे सर्वजण सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात आहे. कोरोनाचे संकट लवकर टळू दे हाच प्रयत्न आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार मित्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी ही माहिती दिली.
सध्या महाराष्ट्रात किंबहूना जगावर मोठे संकट ओढावले आहे. या संकटाला घरीच राहून आपल्याला पराभूत करता येणार आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा या धोरणाचे पालन करत राज्यातील सध्या स्थितीवर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने दिला आहे. त्यामुळे राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जावून कोणीही काम करणार नाही याची मला खात्री आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना मध्यप्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले. संकटाच्या काळातही भाजपच्या मंडळींना सरकार पाडण्याचं सुचतं ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे काय होईल याचे देणेघेणे नाही. भाजप फक्त राजकारणाला प्राधान्य देते हे यातून स्पष्ट होते असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
कोरोनासाठी येणारी मदत जर पंतप्रधान केअरला दिली तरच सीएसआर फंड म्हणून गणली जाईल राज्य सरकारला दिली तर नाही. हे खोट्या प्रवृत्तीची लक्षणे आहेत. भाजप राजकारण करण्यात मश्गुल आहे हे देशातील जनतेला कळून चुकले आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोक सध्या अस्वस्थ आहेत. त्या नैराश्यपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लोकांमध्ये जावून काम करत आहेत त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास आहे. भाजपने काही प्रयत्न केले तरी ते सफल होणार नाही. सरकार खंबीर आहे, १५ वर्षे टिकणार ! असा जबरदस्त विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करायचे असते मात्र भाजपला ते जमत नाही. भाजप म्हणते आम्ही इतक्या लोकांना भोजनाची व्यवस्था केली मात्र प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.
राज्याच्या तिजोरीत सध्या काहीच नाही. मार्चमध्ये लोक मोठ्या प्रमाणात कर भरत असतात मात्र लॉकडाऊनमुळे लोकांना ते करता आले नाही. राज्याला आर्थिक चणचण भासणार आहे मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. महाविकासआघाडी सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र या संकटाला तोंड देईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सरकार राज्यातील ३ कोटी जनतेला स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देणार आहे. मे व जून या पुढील दोन महिन्यासाठी रेशन पुरवले जाणार ज्यासाठी सरकार ४५० कोटी खर्च करणार अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
देशभरात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे पण तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मागण्यांचे जे पत्र लिहिले त्याला अजून उत्तरही आले नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
जिथे रुग्णांची संख्या कमी आहे तिथे लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुरळीत करावी लागेल. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवावे लागेल. या सगळ्यातून बाहेर पडण्याची आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.