Published On : Mon, Apr 20th, 2020

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे ‘सुरक्षा आवरणे’ राज्यभरात वितरणाला सुरुवात

Advertisement

मुंबई -कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या समन्वयातून वितरित करण्याचे काम आजपासून नाशिकमधून सुरू करण्यात आले.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या समन्वयातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सुरक्षा आवरणांचे वितरण आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेत करण्यात आले.

यावेळी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, उपक्रमाचे समन्वयक तेज टकले, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.अमोल वाजे, डॉ.योगेश गोसावी, डॉ.विष्णू अत्रे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.समीर चंद्रात्रे, सचिव डॉ.सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष डॉ.प्राजक्ता लेले, खजिनदार डॉ.प्रशांत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना डॉक्टर व त्यांचे सहकारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने संपूर्ण चेहरा झाकणारी सुरक्षा आवरणे तयार करण्यात आली आहेत. खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला राष्ट्रवादी डॉक्टर सेल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समन्वयातून साहित्य वाटप करण्यात येत आहे. राज्यभरातील सव्वा लाख डॉक्टरांना सुरक्षा आवरणे वाटप करण्यात येत असून याची सुरुवात आज नाशिक येथून करण्यात आली.