Published On : Mon, Apr 20th, 2020

उद्योग समूहाने कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे -पालकमंत्री

Advertisement

नागपूर : उद्या सोमवारपासून लॉक डाऊनमधून काही उद्योगांना सूट देण्यात येत असून औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. आज जिल्ह्यातील कळमेश्वर येथील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात तसेच कळमेश्वर, सावनेर, कामठी आणि मौदा तहसील कार्यालयांमध्ये आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कळमेश्वरचे तहसीलदार सचिन यादव, सावनेरचे तहसीलदार दीपक कारंडे व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमधील उद्योग बंद असून, मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार आहे. तरीही उद्योजकांनी उद्योग सुरु करताना कागमार आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करावा. कामगार सुरक्षित राहिल्यानंतर त्यांचे कुटुंबही सुरक्षित राहील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी येताना त्यांचे योग्य सॅनिटायझेशन होणे आवश्यक आहे. त्यासाठी साबण, सॅनिटायझर, मुबलक पाणी ठेवणे, कामगारांना कामाच्या ठिकाणी मास्क पुरविण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. राऊत यांनी दिल्या.

उद्योग समूहाजवळ जागा उपलब्ध असल्यास कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. इमारतीचे व वाहनाचे निर्जंतुकिकरण करावे. औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठिकाणी स्वछता ठेवावी. इमारतीत प्रवेश करतांना प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग आवश्यक आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या इंडस्ट्रीयल पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा घेताना त्यांनी अन्न प्रक्रिया, कृषी अवजारे, मालवाहतूक, शेतीपूरक व्यवसाय, कोल्ड स्टोरेज, बियाणे प्रक्रिया आदी शासन निर्देशित सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शासनाने काही मार्गदर्शन सूचना केल्या असून त्यानुसारच उद्योग व्यवसाय सुरू करण्यात यावेत असे पालकमंत्री म्हणाले.

शासनाच्या निर्देशानुसार उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करणार असून उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन कृती आराखडा तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उद्योगसमुहाने कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. उत्पादन सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडून गरीब व गरजूंसाठी अन्नधान्य व निवाऱ्याची व्यवस्था

नागपूर जिल्ह्यात परराज्यातील आणि इतर जिल्ह्यातील कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची पुरेशी व्यवस्था निवारा केंद्रांमध्ये करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. निवारा केंद्रामध्ये राहणाऱ्या कामगारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची यादी बनवून शिधापत्रिका तयार करण्याची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. शिधापत्रिका असलेले पण आधारकार्ड नसलेले तसेच आधारकार्ड व शिधापत्रिका नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला धान्य पुरवठा करण्यात यावा. धान्यांपासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कळमेश्वर, सावनेर आदी ठिकाणी गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले.

कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती बाबा पाटील यांनी 1 लाख 31 हजार रुपयाचा तर मोहगाव येथील रहिवासी नि.पू. गजभिये यांनी पाच हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पालकमंत्री यांना सुपूर्द केला.