Published On : Tue, Aug 6th, 2019

‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’…शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेवून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

Advertisement

पुणे -एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा… या शायरीचा किस्सा सांगत आता रडायचं नाही तर लढायला शिका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी जुन्नर येथील जाहीर सभेत केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून कर्जमाफी देण्याची घोषणा केली परंतु किती लोकांना मिळाली. आज छत्रपती असते तर यांचा सगळ्यांचा कडेलोट केला असता असेही छगन भुजबळ म्हणाले.

विम्याच्याबाबतीत तेच करण्यात आले. १४३ कोटी फायदा एका जिल्हयात झाला आहे आणि आज सत्तेतील लोक पीकविमा कंपन्यांवर मोर्चा काढत आहेत असा टोला शिवसेनेला लगावला.

या सरकारने पाच वर्षांत दोन लाख कोटी कर्ज वाढवले आहे. कॉफी डेच्या मालकाने आत्महत्या केली. आज व्यापारीही आत्महत्या करत आहेत. मात्र अदानी अंबानी यांनाच चांगले दिवस आले असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

आजपासून ही यात्रा सुरु करत आहोत ते यश तुमच्या हातात आहे. येत्या काळात कोण सत्तेत येणार हे ठरणार आहे.

कुणाचे आरक्षण कमी करु नका असे सांगूनही आरक्षण कमी केले जात आहे. याचा विरोध आपण केला पाहिजे. पवारसाहेबांनी जे दिले ते काढून टाकण्याचे काम हे सरकार करत आहेत असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

जर पुन्हा सत्तेत येणार आहात तर न घाबरता बॅलेटपेपरवर निवडणूका घ्या असे आव्हान छगन भुजबळ यांनी सरकारला दिले.

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा परंतु आपसात नाही असे सांगतानाच या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून हे सरकार घालवल्याशिवाय थांबायचे नाही असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

तुम्ही सत्तेत आहात मग रडीचा डाव का खेळताय – अजित पवार

आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचा शेतीशी काय संबंध आहे का असा सवाल करतानाच शिवसेना पीकविम्यासाठी मोर्चा काढत आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात ना मग हा रडीचा डाव का खेळताय ? असा रोखठोक सवाल विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला.

सरकार ज्याच्याकडे असते त्याकडे जरब पाहिजे परंतु यांच्यामध्ये ती धमकच नाही असा टोला लगावला.

येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे युवक आणि महिलांना जास्त संधी देणार आहोत. त्यांना आशिर्वाद देण्याची जबाबदारी ही राज्यातील जनतेची आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

ही भारताची निवडणूक नाही महाराष्ट्राची निवडणूक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेल ठरले आहे. अल्पसंख्याक, शेतकरी, महिला, मागासवर्गीय यांना संरक्षण देण्यास हे सरकार फेल ठरले आहे. त्यामुळे आता यांना घालवणे गरजेचे आहे. भरमसाठ कर आकारला जात आहे. या सरकारची नजर सामान्यांच्या खिशावर आहे. हे सरकार फक्त मुठभर लोकांसाठीच आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.

माझ्या मतदारसंघातही पूरपरिस्थिती आहे. तिथे नसतो आलो तर माध्यमांनी उलटसुलट बातम्या लावल्या असत्या. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. मी काही पदाधिकाऱ्यांना तिकडे जबाबदारी सोपवली आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल सरकारला केला.

काल ३७० कलम काढले त्याचे मी समर्थन करतो. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे असे सांगतानाच काही मंत्री नाचत होते त्याचा किस्सा अजितदादांनी जाहीर सभेत मांडताना महाराष्ट्र इथे अडचणीत आहे तुम्ही नाचता कसले ? तुम्ही जनतेची काम करण्यासाठी आहात. लोकप्रतिनिधी आहात नाचे नाही असा टोला लगावला.

आघाडी सरकार आले तर नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा करू असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले.

आघाडी सरकारच्या १७५ जागा जिंकून येतील एवढी धमक आपल्यात आहे. जुन्नरची जागा जिंकाच पण अकोले, संगमनेर आणि इतर जागाही जिंका असे आवाहनही केले.

लोकांच्या खिशावर घाऊक डल्ला कसा मारायचा हे भाजपने पाच वर्षांत दाखवून दिले – जयंत पाटील

लोकांच्या खिशावर घाऊक डल्ला कसा मारायचा, हे भाजपने पाच वर्षांत दाखवून दिले आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जुन्नर येथील जाहीर सभेत केली.

महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांमध्ये कसा कारभार सुरु आहे, हे सांगण्यासाठी ही यात्रा आहेच पण त्याशिवाय पुढच्या ५ वर्षातला महाराष्ट्र कसा असेल, हे देखील या यात्रेच्या माध्यमातून सांगितले जाईल असे आमदार जयंत पाटील यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले.

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन काही लोक मागच्यावेळी सत्तेत आले. पण पाच वर्षांत केवळ राज्याची अधोगतीच झाली. ही अधोगती सामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात जाऊन विचारा तेथील तरुणांना रोजगार मिळाला आहे का? उत्तर नकारार्थीच मिळेल असेही जयंतराव पाटील म्हणाले.

वाहनांची विक्री खाली घसरली आहे. बर्‍याच कारखान्यातून कामगारांना काढण्यात येत आहे. जुन्नरमध्ये एकाही व्यापाऱ्याने जीएसटीनंतर व्यवसाय कसा चालू आहे याचे उत्तर द्यावे अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली.

अर्थसंकल्प तुटीचा असताना राज्याचा विकास कसा होईल, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

आमच्यातून दोन – तीन नेते फुटल्याची चर्चा केली जाते. मात्र ज्यात दम नसतो तोच फुटतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात फितुरांना काय शिक्षा दिली ही आपल्या सर्वांना माहीत आहेच याची आठवण जयंत पाटील यांनी सर्वांना करुन दिली.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आम्ही एक अर्ज सर्वांना देत आहोत. त्यात सुशिक्षित बेरोजगारांनी आपली नोंदणी करायची आहे. आमचे सरकार आल्यानंतर त्या सर्व तरुणांना जिल्ह्यातच नोकरी देऊ असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

माझ्या मतदारसंघात अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही मी या सभेसाठी वेळ काढून आलो. मात्र यापुढे मला मतदारसंघात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार असल्याचे सांगितले.

जे पक्ष सोडून जात आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण मला प्रदेशाध्यक्ष म्हणून आता तरूण नेतृत्वाची नवी पिढी तयार करता येईल असेही जयंत पाटील यांनी जाहीर केले.

भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा…तर

शिवस्वराज्य यात्रा ही जनतेच्या कल्याणासाठी – धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याची पवित्र माती कपाळाला लावून शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभीच हे दळभद्री सरकार उलथून टाकून, रयतेचे राज्य आणण्याचा निश्चय धनंजय मुंडे जाहीर केला.

जुन्नर येथील पहिल्या सभेत बोलताना भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे असा टोला विधान परिषदे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावत मुख्यमंत्र्याच्या यात्रेला महा’धना’देश यात्रा म्हणत हिणवले. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीच आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

शिवस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असल्याची ग्वाही त्यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या सरकारने वेळोवेळी अपमान केला आहे. छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीही फसवी निघाली. त्यामुळे जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.

इतिहासात छत्रपतींच्या घराण्यात फुट पाडण्याचे काम अनाजी पंतांनी केले याची नोंद आहे. आजही महाराष्ट्रात आधुनिक अनाजी आहेत असे म्हणत त्यांनी भाजपाच्या पक्ष फोडाफोडीच्या कृतीला फटकारले.

७२ हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगा भरती सुरू केली आहे. भाजपामुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढत चालल्याची दुर्दैवी चित्र समोर येत असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली.

लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू आहे. म्हणे ५० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र आर्थिक अहवालात तर मुख्यमंत्र्यांचं हे ‘सत्य’ कुठेच नाही. मुख्यमंत्री साहेब, किती खोटं बोलवं याचे भान राखण्याची तंबी त्यांनी दिली.

पेरणी करण्याचं काम कोण शिकत असेल तर चांगली गोष्ट – अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंना टोला…

पेरणी करण्याचं काम कोण शिकत असेल तर चांगली गोष्ट परंतु बैल कुठे, नांगर कुठे हेही पाहिले पाहिजे असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांना जुन्नरच्या जाहीर सभेत लगावला.

आज राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे यावर भाष्य करतानाच कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा असा संतप्त सवालही केला

येत्या निवडणुकीत डोळे, बुद्धी शाबुत ठेवून काम करा. राष्ट्रवादीचा युवक कार्यकर्ता आज पेटून उठला आहे. त्यामुळे आता
बुमरॅंग होवून सत्ताधाऱ्यांवर उलटवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात तरुणांमध्ये जोश भरण्याचे काम केले.

नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी यावेळी शपथ घेण्यात आली. ही शपथ डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वांना दिली.

सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, युवा नेते अतुल बेंडके यांनी आपले विचार मांडले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते व माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आमदार विदया चव्हाण, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, महेश चव्हाण,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, युवा नेते अतुल बेंडके आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली.

ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते. यावेळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गडावरील देवीची पुजा व आरती करत नव्या स्वराज्याच्या लढ्याची सुरुवात करण्यात आली.

भाजप- शिवसेना सरकारच्या विरोधात पदयात्रा, हल्लाबोल आणि परिवर्तन यात्रा यशस्वीपणे काढल्यानंतर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात शिवनेरीवरुन विरोधाची तुतारी आज फुंकली.

ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.