Published On : Thu, May 10th, 2018

नोटाबंदी, मांसबंदीनंतर मोदीबाबा नसबंदीही करतील : धनंजय मुंडे

Advertisement

सांगली : २०१४ साली संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी ज्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेच्या भरवश्यावर विजयी झाले. त्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची आज गावागावात चेष्टा सुरु आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगलीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

“देशात नोटाबंदी, मांसबंदी करणारे हे मोदीबाबा परत सत्तेत आले तर आपली नसबंदी करण्यास मागेपुढे बघणार नाहीत” असा टोलाही धनंजय मुंडेंनी पंतप्रधानांना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ‘बहुत हो गयी महंगाई’ म्हणणाऱ्या भाजपच्या सत्तेत आज महागाई चार पटीने वाढली आहे. बेरोजगारी फोफावत चालली आहे. ज्या तरुणांनी मोठा रोजगार मिळेल या आशेने मोदींना निवडून आणले. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा दिल्या, तीच तरुणाई २०१९ मध्ये भाजपाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार, असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला.

मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असल्याचे गाजर दाखवले होते. पण जनतेला अजूनही १५ लाख मिळण्याची आशा लागून राहिली आहे. पण बँकेत १५ लाख येतील हे विसरा, मोदींच्या कृपेने १५ लाखाचे कर्ज तुमच्यावर दिसले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं धनंजय मुंडे म्हणाले. सांगली जिल्ह्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले की परिवर्तन होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आता जयंत पाटील यांच्या रुपाने पुन्हा एकदा सांगलीला प्रदेशाध्यक्षपद प्राप्त झाल्याने सत्ता परिवर्तन निश्चित होईल असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.