सातारा : राजधानी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाही घरण्याकडून देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी काल खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. २७ मे रोजी होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, हा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. एकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजेंचं नाव न घेता केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि उद्यनराजेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत मिष्किल टीका केली होती. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत पेचाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले होते की, ‘काही पेच-बीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं, उतारा वगैरे काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी (वर) असते ती कॉलर अशी (खाली) होते’, असा टोमणा त्यांनी उदयनराजेंना मारला होता.