Published On : Sun, Jun 10th, 2018

शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावं, शरद पवारांचे आवाहन

Advertisement

Sharad Pawar

नोटाबंदीने सामान्य नागरिक, आया-बहिणी भिकेला लागल्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अजूनही झालेली नाही. देशात कुणीही सुखी नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. भाजपाचा जर पराभव करायचा असेल तर शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावे असे आवाहन करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची बेरीज झाली तर भाजपाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुलेंच्या पगडीचा वापर करण्याची सूचना करत छगन भुजबळ यांना फुलेंची पगडी घातली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भुजबळ यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला होता.

सत्तेचा मस्तवालपणा राष्ट्रवादीने कधीच दाखवला नाही, असे सांगत भाजपाचे पालघरचे यश हे खरे नव्हे. भाजपासोडून देशातील सर्व पक्षांनी एकत्र यावे. आपण सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाला भेटून इव्हीएम बंद करून जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्याची विनंती केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र सदन- दिल्लीतील सर्वांत सुंदर वास्तू

भुजबळांबाबत बोलताना ते म्हणाले, छगन भुजबळांनी काय गुन्हा केला होता. महाराष्ट्र सदन ही आज दिल्लीतील सर्वांत सुंदर वास्तू आहे. आज सर्वचजण अगदी सरकारी कार्यक्रमही महाराष्ट्र सदनात पार पडतात. अशी सुंदर वास्तू उभारणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुरूंगात टाकता, असा सवाल उपस्थित केला.

आता हे नेते धमकीचे पत्र आल्याचे कारण सांगत आहेत. धमकीचे पत्र आल्याचे कोणी माध्यमांना सांगत नाहीत. पोलिसांना सुरक्षेबाबत सूचना केल्या जातात, असे सांगत धमकी प्रकाराबाबत शंका उपस्थित केली. देशाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यायला हवं असं आवाहनही त्यांनी केले.