राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस व समविचारी पक्षाच्या आघाडीला चांगले यश मिळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मिडियाशी बोलताना केला.
केंद्र आणि राज्यसरकारच्या कारभाराबाबत देशात आणि राज्यात मोठी नाराजी आहे. राज्यातील आणि देशातील शेतकरी,कामगार आणि युवक हे घटक नाराज आहेत. यापार्श्वभूमीवर येत्या लोकसभेत आमची काय भूमिका असावी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिवाय या सरकारने काँग्रेस आणि आमच्यावर भ्रष्टाचाराची तोफ डागली होती. परंतु आज तेच स्वत: राफेलच्या मुद्दयावर अडचणीत आले आहेत असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.
देशातच नव्हे तर राज्यातही शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या निवडणूकांमध्ये भाजपची जी निती आहे त्याविरोधात लोकांनी मतदान केले आणि सरकार बदलवून दाखवले आहे.या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येसुध्दा जी परिस्थिती समोर आहे. मागील वर्षी लोकसभेची पोटनिवडणूक झाली भंडारा-गोंदियाची जागा आम्हाला जिंकता आली तर पालघरमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी आमच्यामध्ये विभागणी झाली त्यामुळे त्यांना ती जागा मिळाली असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
देशात आणि राज्यात परिवर्तनाच्यादिशेने सगळे पक्ष चर्चा करत आहेत. शरद पवारसाहेबांनी यापूर्वीच सांगितले होते की, राज्याराज्यातील पक्षांनी व्यवस्थित साथ दिली तर नक्कीच राज्यात आणि देशामध्ये बदल होईल. त्यादृष्टीने विचारविनिमय सुरु आहे असेही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
मोदींनी जी आश्वासने दिली होती. भ्रष्टाचारमुक्त भारत देणार होते. या सगळया गोष्टी लोकांना आता माहित झाल्या आहेत. त्या फक्त निवडणूकामधील घोषणा होत्या हे आता सिध्द झाले आहे आणि आत्ता आपली फसवणूक झाली आहे हेही लोकांना कळून चुकले आहे.हाच मुद्दा घेवून त्यावर पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा सुरु असल्याचेही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक,माजी मंत्री भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आदी उपस्थित होते.

