Published On : Thu, Aug 6th, 2020

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप, मैत्रिणीकडून तक्रार दाखल

नागपूर : सोबत काम करणाऱ्या एका महिलेने राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप लावला. ४५ वर्षांच्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी सोहेल पटेल (वय ५५) नामक व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सोहेल जाफर नगरात राहतो.

त्याला पत्नी आणि मुले आहेत. पाचपावली पोलिसांच्या माहितीनुसार, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. सोबत पक्षाचे काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसोबत त्याची २०१८ मध्ये ओळख झाली. ती विवाहित असून तिलाही दोन मुले असल्याचे समजते. दोघांमधील सलगी वाढल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये त्याने पहिल्यांदा महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडू लागला. दीड वर्षाच्या कालावधीत या दोघांनी नागपूर, भंडारासह ठिकठिकाणी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अलीकडे त्यांच्या संबंधात कटुता आली. त्यामुळे वाद वाढले. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी महिलेने पाचपावली पोलिस ठाण्यात धाव घेऊन सोहेलविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. पोलिसांनी अर्ज चौकशी केल्यानंतर सोहेल विरुद्ध बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आम्ही सोहेलचा शोध घेत आहोत, असे पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे यांनी सांगितले.

लग्नास नकार आणि होकार ! सोहेल आणि तक्रार करणारी महिला एकाच जातीची असल्यामुळे लग्न करावे, असा अट्टाहास तिने धरला होता. मात्र, दोघेही विवाहित त्यात दोघांनाही मुले असल्यामुळे प्रारंभी तो नकार देत होता. तिने पोलिसांकडे धाव घेतल्याचे कळल्यानंतर त्याने लग्न करण्याची तयारी दाखवून कारवाई टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र होकार आणि नकाराच्या कालावधीत गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण चर्चेला आले.