मुंबई : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज दिले.
विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आ.जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्रियेचे पालन केले नसल्यास निलंबित करावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कालच दिले होते.
याबाबतच्या इतिवृत्तात पोलीस आयुक्त हेमंत नागराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची बाब आ. जयंत पाटील यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश या अधिकाऱ्यांनी दिले. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली. यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.