राष्ट्रीयता ही सामाजिक अभिव्यक्ती
भदंत विमलकित्ती गुणसीरी यांचे प्रतिपादन
नागपूर: राष्ट्रीयता ही सामाजिक अभिव्यक्ती असून आम्ही सर्व एक आहोत. आपआपसात बंधुभाव व सामाजिक एकोपा असेल तर राष्टÑीयतेचे बीज मनामनात आणि घराघरात रूजू लागेल, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसीरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे सामूहिक वैशाख दिन समारोहानिमित्त इंदोरा मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने, डॉ. सतीश दांडगे, साहित्यिक डॉ. लता मधुकर, प्रा. देवीदास घोडेस्वार आदी उपस्थित होते. ‘राष्टÑ निर्मितीसाठी बुद्ध धम्माची आवश्यकता’ याविषयावर बोलताना भदंत गुणसीरी म्हणाले, जातीयता ही राष्टÑनिर्मितीसाठी मोठी अडचण आहे. जोपर्यंत जाती नष्ट होत नाही तोपर्यंत राष्टÑीयतेची संकल्पना पूर्णत: यशस्वी होऊ शकत नाही. मी प्रथम व अंतत: भारतीय आहे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनध्येयच आपण सर्वांना एकत्र ठेऊ शकते. तसेच भारतीयांना अंतर्गत कलहापासून वाचवू शकते, असेही ते म्हणाले.
लक्ष्मण माने यांनी सामाजिक बदल कसा घडत गेला, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले शिक्षण आणि बुद्ध धम्माविषयी जागरुकता निर्माण केल्यामुळे आज रस्त्यावर भटकून आपला उदरनिर्वाह करणाºया समाजात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली आहे. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून कामधंदे स्वीकारले आहे. हनुमंत उपरे यांनी भटक्या लोकांना हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात आनले. म्हणजे गुलामगिरीतून माणुसकीकडे आणले असे समजतो, असेही त्यांनी सांगितले. निर्भया आणि खैरलांजी हत्याकांडावर कसे राजकारण झाले, याविषयी डॉ. लता मधुकर यांनी सांगितले. बुद्धिझम भारताला आणि जगाला तारू शकते असे त्यांनी अनेक उदाहरणांसह पटवून सांगितले. प्रा. घोडेस्वार यांनी भारतीय घटनेतील विविध कलमांचा संदर्भ देऊन त्याचे आकलन केले. राजकारणात धर्म, जात, पंथ कसे विध्वंसक असू शकतात यावरही त्यांनी प्रकाश टाकला. भारतीय घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय हे कसे बुद्धिझमवरून घेतले यांचे त्यांनी विश्लेषन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नीरज बोधी यांनी, तर आभार आंबेडकरी विचारवंत डॉ. सूचित बागडे यांनी मानले.