Published On : Fri, Nov 27th, 2020

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस मनपा अधिकारी – कर्मचारी सायकलने कार्यालयात २ डिसेंबर ला येतील

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी येत्या २ डिसेंबर ला सायकलने कार्यालयात येतील, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

श्री. जोशी यांनी सांगितले की, आमची अपेक्षा आहे की जास्तीत-जास्त कर्मचारी व अधिकारी या मोहिमेत सहभागी होतील. नागपूरात वायु प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीकोणातून हा प्रयत्न केला जाईल. सायकलने कार्यालयात आल्यावर प्रदूषण तर कमी करण्यास मदत होईल, तसेच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल. अधिकारी व कर्मचारी कार्यालयाचे वेळेवर सकाळी ९.३० ते ९.४५ वाजेपर्यंत सायकलनी येतील.

भोपाळ गॅस कांडात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतित “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” दरवर्षी पाळण्यात येतो. वर्ष १९८४ मध्ये २ आणि ३ डिसेंबरच्या रात्रीला विषारी गॅस गळल्याने असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला होता.

सोबतच शहरातील इतर नागरिकांनीही “राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिना” निमित्त २ डिसेंबर रोजी वाहनाने होणा-या प्रदुषणावर नियंत्रण राखण्यास “सायकल-दिवस” पाळावा असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. जोशी यांनी सांगितले की, पर्यावरण विषयावर काम करणा-या शहरातील काही स्वयंसेवी संस्था (NGO) जसे श्री.कौस्तव चॅटर्जी ग्रीन व्हीजील फाउंडेशन, श्रीमती लिना बुधे सेंटर फार सस्टेनेबल डेव्हल्पमेंट, श्रीमती अनुसया काळे-छाबराणी टुगेदर वूई कॅन इत्यादींनी देखील या निमित्याने प्रदुषणावर नियंत्रण करण्यास त्यांचाही सहभाग राहणार असल्याचे कळविले आहे. तसेच यापूढेही दर महिन्यात किमान एक दिवस म.न.पा.चे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील असे आवाहनदेखील त्यांनी केली आहे.