नवी दिल्ली – देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा मानली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी-हिंदी भाषावादाच्या चर्चेत संघाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “मातृभाषेतून शिक्षण ही संघाची जुनीच भूमिका आहे.” देशातील विविध भागांतील नागरिक आपल्या मातृभाषेत संवाद साधतात. त्यामुळे शिक्षण मातृभाषेतून दिल्यास विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि भावनिक विकास अधिक प्रभावी होतो, असेही आंबेकर यांनी नमूद केले.
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रचारक बैठकीत संघाच्या विस्तार योजना, शताब्दी वर्ष उत्सव आणि विविध प्रांतांतील परिस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली. संघ शताब्दी वर्षानिमित्त ५८,४०९ शाखांमध्ये आणि ११,३६० वस्त्यांमध्ये ‘हिंदू संमेलन’ घेणार आहे. यासोबतच ‘घर-घर संपर्क’ अभियान राबवून समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
संघाच्या पंच परिवर्तन योजनेत केवळ आर्थिक व तांत्रिक प्रगती पुरेशी नसून, पर्यावरण संरक्षण, कुटुंब मूल्यसंवर्धन आणि सामाजिक समरसता यांचाही समावेश आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. वर्षभरात २१,८७९ स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, ४० वर्षांखालील आणि ४० ते ६० वयोगटातील स्वयंसेवकांचा त्यात सहभाग आहे.
मणिपूरमधील तणाव कमी करण्यासाठी संघ मैतेई आणि इतर समुदायांशी संवाद साधून शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचेही आंबेकर यांनी स्पष्ट केले.