नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.नागपूर लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यासाठी नागपूर पोलीस अलर्ट मोडवर असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान सभास्थळी हेलिकॉप्टरने जाणार असले तरी पोलिसांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सभास्थळापर्यंत बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय काही मार्गांवर वाहतूक व्यवस्थेतदेखील बदल करण्यात आले आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदान असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभांचे आयोजन पूर्व विदर्भातील मतदारसंघामध्ये केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सोमवारी सभा घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वाजता सभेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे मंचावर उपस्थित राहणार आहेत.
वाहतूक व्यवस्थेत बदल अशा प्रकारे –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे आज बुधवारी दुपारी २ ते ९ या वेळेत मानकापूरकडून कामठीकडे जाणारी अवजड वाहने नवीन काटोल नाका चौक, कोराडीकडे वळविण्यात येणार आहेत. आशा हॉस्पिटल, कामठीकडे जाणारी वाहने खापरखेडा मार्गाने जातील. कळमनाकडून येणारी वाहने कळमना टी-पॉइंट येथे थांबवून आशा हॉस्पिटल मार्गे खापरखेडाकडे रवाना करण्यात येतील. इंदोराहून ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणारी वाहने ऑटोमोटिव्ह चौकातून डावे वळण घेऊन मानकापूर चौकाच्या दिशेने जातील.