मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागले असून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, असा दावा शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केला.
एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावे तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
निवडणुकांच्या तोंडावर भाजपाच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात अमित शाह यांचा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्यात येतील. या सगळ्या वातावरणात एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे भाजपासह जातील का?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोधकांची आघाडी आहे. त्या आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष आणि काँग्रेसने हातमिळवणी करत भाजपविरोधात मोट बांधली. यातच शिंदे गटाच्या आमदाराने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल आणि ते भाजपासह येतील असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.