Published On : Fri, Sep 22nd, 2017

नारायण राणे यांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय व्यक्तीगतःडॉ. राजू वाघमारे

Advertisement

मुंबई: नारायण राणे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षाने आपल्यावर अन्याय केला अशा स्वरुपाचे जे आरोप केलेले आहेत. त्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून हे आरोप निराधार असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना डॉ. राजू वाघमारे म्हणाले ज्या दिवशी नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या दिवसापासून जो पर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तोपर्यंत त्यांना काँग्रेस पक्षाकडून महत्त्वाची मंत्री पद देण्यात आली. त्यांच्या घरामध्ये तीन-तीन तिकिटे देण्यात आली. पुत्र निलेश राणे यांना खासदारकीची संधी, स्वतः राणे व दुसरे पुत्र नितेश यांना आमदारकीची संधी देण्यात आली होती. तसेच दीड वर्षाच्या कालावधीत त्यांना दोनदा विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते. वांद्रे पोटनिवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. या सर्व बाबीचा विचार करता काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असे म्हणणे चुकीचे आहे.

काँग्रेस पक्षाला १३५ वर्षाचा इतिहास आहे. पक्षाची एक विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरुन चालणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे संघटन पक्षाकडे आहे. काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे कोणीही काँग्रेस संपवण्याच्या वल्गना केल्या तरी काँग्रेस पक्ष संपणार नाही असे डॉ. वाघमारे म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या एका बड्या नेत्यांने नारायण राणे यांचे दाऊदशी संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आणि आज नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपची मंडळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ब्लॅकमेल तर करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केला.