नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असून, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत १७ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.
नंदनवन परिसरातील देशपांडे लेआउट येथील एनआयटी उद्यानासमोर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ३८ वर्षीय सुनील जुनेजा आणि ३२ वर्षीय अतुल शेंडे यांना ताब्यात घेतले. तर निहाल उर्फ ‘बाबा शेंडे’ हा पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी आरोपींकडून १७ ग्रॅम एमडी पावडर, दोन मोबाईल फोन आणि एक मोपेड असा एकूण सुमारे १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे ५२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी सुनील जुनेजा याच्याविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपी निहाल उर्फ ‘बाबा शेंडे’ याचा शोध घेण्यासोबतच जप्त केलेल्या एमडीचा पुरवठा कुठून झाला आणि या मागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.





