बेला : माळीपुऱ्यातील संत केजाजी महाराज मंदिरात प्रथा व परंपरेनुसार यंदाही संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित भजन पूजन ,अभिषेक, गोपालकाला ,पालखी ,दिंडी यात्रा व महाप्रसादास भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने संतभूमी बेला नगरीत भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली.
संत केजाजी महाराज यांची बेला ही जन्मभूमी आहे. नामदेव महाराज त्यांचे पुत्र होत. त्यांचा जन्म घोराड ( सेलू जिल्हा वर्धा) येथे झाला. संत केजाजी व नामदेव महाराज हे विठ्ठलाचे परम भक्त होते. जन्मभूमी असल्याने संत केजाजी महाराज यांचे बेला येथे माळीपुऱ्यात देवस्थान आहे. येथील माळी समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून या संत, महात्म्यांची मनोभावे भावभक्तीने पूजा अर्चा करून केजाजी व नामदेव महाराजांची जयंती, पुण्यतिथी दरवर्षी उत्साहात साजरी करतात.
नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत केजाजी भजन मंडळ, सावंगी येथील भजन मंडळ, क्षीरसागर यांचे महिला भजन मंडळ, महाकाळकर महिला भजन मंडळ, मंदाबाई भाकरे यांचे महिला भजन मंडळ, पुष्पाताई ठोंबरे यांच्या महिला भजन संच यांनी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पालखी दिंडी यात्रा गावातून मुख्य मार्गाने काढली.
या विलोभनीय सोहळ्याने बेलानगरी दुमदुमली. पुण्यतिथीच्या यशस्वीतेसाठी केजाजी मंदिराचे पदाधिकारी सचिव वसंतराव कळसकर, माजी ग्रा. पं. सदस्य यादवराव भनारकर रवी व अशोक भोकरे, सुभाष कावळे ,अरुण कावळे, प्रमोद गवळी, चंदू भोकरे, अनुसया कावळे शरद पावसे, शेषराव कावळे व मोहल्ल्यातील अनेक भक्तांनी मोलाचे अथक परिश्रम घेतले. भव्य महाप्रसादाने थाटात सांगता झाली.