Published On : Fri, Nov 8th, 2019

‘फायटॉराइड’ पद्धतीने होणार नाईक तलावाचे पुनर्जीवन

नागपूर : भोसलेकालीन नाईक तलावाच्या पुनर्जीवनासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) पुढाकार घेतला आहे. ‘फायटॉराइड’ (Phytorid) पद्धतीचा उपयोग करून नाईक तलावाचे पुनर्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ८) उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत नीरी ने प्रस्तावित प्रकल्पाची माहिती सादर केली.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, नगरसेविका यशश्री नंदनवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नीरी च्या वरीष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. रिता धापोडकर, नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे अधिकारी मोहम्मद शफीक आदी उपस्थित होते.

यावेळी नीरी च्या वरीष्ठ तांत्रिक अधिकारी रिता धोपडकर यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. सद्यस्थितीत नाईक तलावात सिवेजचे पाणी जात असल्याने तलाव प्रदुषित झाले आहे. या तलावाचे पाणी शुद्ध करण्याकरिता ‘फायटॉराइड’ पद्धतीचे ट्रिटमेंट प्रकल्प लावण्यात येईल. या ट्रिटमेंट प्रकल्पाद्वारे तिन्ही सिवेज लाईन जोडून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येईल. १.८ एमएलडी एवढी ट्रिटमेंट प्रकल्पाची क्षमता असेल. याशिवाय नीरीद्वारे तलावाची सफाई करुन त्यातील घाण बाहेर काढण्यात येईल. तलावाचे पाणी साफ ठेवण्यासाठी ‘फ्लोराफ्ट्स’ (Florafts) व ‘एरिएटर्स’ (Aerators) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तलावाची फेन्सिंग करुन ते सुरक्षित करण्यात येईल. हरीत लवादच्या निर्देशानुसार पाण्याची गुणवत्ता राखली जाईल, असेही तांत्रिक अधिकारी डॉ. रिता धापोडकर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे तलावात दोन मोठे कासव आहेत. त्यामुळे तलावाचे पुनर्जीवनाची आशा असल्याचे नीरीतर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, नीरीच्या माध्यमातून तलावाला नवी संजीवनी देण्यासाठी सोलर पॅनलचाही उपयोग करण्यात येईल. या प्रस्तावार तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच सौंदर्यीकरण कार्य पूर्ण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.