Published On : Mon, Sep 4th, 2017

नागपूरच्या गौरीचा स्मरणशक्तीचा विश्वविक्रम;1 मिनिटात 50 वस्तू लावल्या क्रमवारीने

Advertisement

नागपूर: परीक्षकांनी विसंगतीने लावलेल्या वस्तूंचे केवळ एका मिनिटात निरीक्षण करून त्या वस्तू त्याच क्रमवारीने संगती न चुकवता लावण्याचा नवा विवश्वविक्रम नागपूर येथील गौरी काेढे हिने केला. गिनीजकडून तिला दोन महिन्यांत प्रमाणपत्र मिळेल.

यापूर्वीचा विश्वविक्रम नेपाळच्या अर्पण शर्मा याच्या नावावर होता. त्याने ४२ वस्तू संंगतवार लावण्याचा विश्वविक्रम २६ सप्टेंबर २०१५ मध्ये केला होता. गौरीने ५० वस्तू न चुकता क्रमवारीने लावल्या. ती एस्पायर इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सातवीची िवद्यार्थिनी आहे. तिचे वडील मनीष कोढे महावितरणमध्ये अभियंता आहे. तर आई वैशाली स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवणारी प्रशिक्षक आहे. गौरीने यापूर्वी भारतीय संविधान मुखोद््गत करून विश्व विक्रम, जिनिअस अवाॅर्ड तसेच प्रतिष्ठित इंडिया बुक अॉफ रेकाॅर्डस आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवले आहे.

सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्याजवळ असलेली एकेक वस्तू परीक्षकांना दिली. त्या नंतर परीक्षकांनी गौरीच्या पाठीमागे त्या वस्तू जमेल तशा ठेवल्या. त्या नंतर घंटी वाजवून गौरीला वस्तुंचे निरीक्षण करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला. एक मिनिटानंतर सर्व वस्तू उचलून बाजूला कडबोळे करून ठेवण्यात आल्या. गौरीने १५ मिनिटात सर्व वस्तू आधी होत्या त्याच क्रमवारीने लावल्या. तिला एकूण ५३ वस्तू देण्यात आल्या होत्या. त्यापैकी स्मरणशक्तीच्या आधारे ५० वस्तू तिने अचूक लावल्या. तीन वस्तुंचा क्रम चुकला तरी तिच्या नावाने नवा विश्व विक्रम झाला. आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार यांनी तिला शुभेच्छा दिल्या. जबरदस्तीने अभ्यास करू नका. अभ्यास सहज झाला पाहिजे, असे गौरीने सांगितले.