Published On : Fri, Apr 27th, 2018

मेट्रोच्या फोटोग्राफी स्पर्धेला नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद

नागपूर: महा मेट्रो नागपूर प्रकल्पातर्फे जॉय राईडची संकल्पना राबविली जात असतानाच दुसरीकडे या प्रकल्पाबद्दल सर्व सामान्य नागपूरकरांना या संबंधीची अधिक माहिती मिळावी आणि नागपूरच्या हौशी छायाचित्रकारांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत यावे याकरता एका फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एप्रिल महिन्याकरता आयोजित या फोटोस्पर्धेला तमाम नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने याकरता प्रवेशिका या स्पर्धेचे आयोजक महा मेट्रो नागपूर यांना प्राप्त झाल्यात.

महा मेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. स्पर्धेत अभिनव फटिंग या स्पर्धकाने प्रथम क्रमांक पटकावला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरु असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला. यासह रुपेश बत्तासे, अक्षय पाटील, वैभव साठवणे, सुचानंदन सिंघा आणि रोशन टिंगने या स्पर्धकांना विशेष पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांकरता पारितोषिक वितरण सोहळा लवकरच आयोजित केला जाईल.

नागपूर मेट्रो आणि मेट्रोचे कार्य सध्या प्रत्येक नागरिकांसाठी कौतुहलाचा विषय ठरतो. महा मेट्रो नागपूर हि आपल्या भावी प्रवाश्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. महा मेट्रो नागपूरतर्फे दरमहा फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. एप्रिल महिन्याकरता आयोजित या स्पर्धेला नागपूरकरांनी उदंड पाठिंबा दिला. यापुढे होणाऱ्या स्पर्धेत अश्याच प्रकारे सहभागी होण्याचे आवाहन महा मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाशी संबंधित फोटो या स्पर्धेत स्वीकारले जातील.