Published On : Thu, May 3rd, 2018

डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी

Advertisement


नागपूर: नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक ३) डॉ फडणवीस यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

डॉ मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा त्या वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.

डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

डॉ मृणालिनी फडणवीस यांनी डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर येथून अर्थशास्त्र तसेच एकॉनोमेट्रिक्स या विषयांत एम.ए. तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

Advertisement

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश पी. वेंकटरामा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. प्रो. शंतनू चौधरी, संचालक, सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इंस्टीट्युट, (सीरी) पिलानी, राजस्थान व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी समितीचे सदस्य होते.