
नागपूर : बाबादीपसिंग नगर, समता नगर रोड परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, नागरिकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चिखल, खड्डे आणि असमतल पृष्ठभाग निर्माण झाल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्लॉट क्रमांक ५, बाबादीपसिंग नगर, समता नगर रोड, राहुल बोधी बुद्ध विहारच्या मागे, रोही चर्चसमोर, नागपूर–४४००२६ या परिसरातील रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्याचे लेव्हलिंग, योग्य निचरा व्यवस्था आणि डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत नागपूर महानगरपालिका तसेच संबंधित प्रभाग अधिकारी आणि नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशांत सदावर्ती यांनी केली आहे. तसेच या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करून करण्यात आलेल्या कामाची माहिती नागरिकांना द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.




