नागपूर – वाठो़डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बियर शॉपमध्ये घडलेली चोऱी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही चोरी जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती चोरट्याच्या लवचिक आणि चपळ हालचालींमुळे चर्चेचा विषय बनली आहे. चोरट्याने एका बारीक खिडकीतून आत शिरून फक्त काही सेकंदांतच २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
सीसीटीव्हीने उघड केली चोरीची शैली-
ही घटना रमाश्री बियर शॉपमध्ये घडली. दुकान मालकाला काउंटरवरील रोकड गायब आढळल्यानंतर त्याने त्वरित पोलीसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एक तरुण बिअर देण्यासाठी ठेवलेल्या संकुचित खिडकीतून आत शिरताना आणि रोख रक्कम घेऊन बाहेर जातानाचा व्हिडीओ सापडला. त्याच्या चपळ हालचाली पाहून पोलिसांसह नागरिकही थक्क झाले.
चोरट्याची ओळख पटली, अटकेत घेतलं-
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्याचे नाव शेख राजा शेख बाबा (वय २०) असे असून, त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीने या चोरीसह अमरावतीत दोनचाकी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
‘लवचिक चोर’ सोशल मीडियावर हिट-
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून, अनेक नेटिझन्सने या चोरट्याला ‘जिमनास्ट चोर’, ‘फ्लेक्सिबल थीफ’ अशी नावं ठेवली आहेत. त्याच्या फुर्तीवर आधारित अनेक मजेशीर मीम्सदेखील इंटरनेटवर झळकू लागले आहेत.
दुकानदारांमध्ये चिंता; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह-
या घटनेनंतर लहान दुकानदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. काउंटरवरील रोकड सुरक्षीत न ठेवणं आणि दुकानदारांनी योग्य संरचना न करणे, यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं दिसून आलं आहे.
पोलिसांचा इशारा व सूचना-
वाठो़डा पोलिसांनी व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही प्रणाली बळकट करण्यासोबत खिडक्या-दारांची मजबूत सुरक्षा यंत्रणा तयार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांपासून बचावासाठी खबरदारी अत्यंत गरजेची आहे.