
नागपूर : गुवाहाटी येथे नागपूरच्या दोन युवकांना बंधक बनवून जिवंत जाळण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तहसील पोलिसांनी लष्करीबाग, पंचपावली येथील नितीन दिलीप वंजारी याला अटक केली आहे. पोलिसांनी असममधील चिरांग जिल्ह्यात कारवाई करून दोन्ही युवकांची सुखरूप सुटका केली. मात्र, रॉकी नावाचा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरा येथील इकरा तबस्सुम असरार अहमद यांचा भाऊ हसनैन बिलाल असरार अहमद आणि त्याचा मित्र रोशन ऊर्फ जुबेर राजेश बुदेल हे ११ ऑक्टोबर रोजी म्यूल अकाउंटच्या कामासाठी गुवाहाटी येथे गेले होते. हसनैनने बहिणीला दिलेल्या माहितीनुसार, भंडारा येथील सुमीत राजू सहारे याचे बँक ऑफ इंडियातील खाते घेऊन तो गेला होता. त्याबदल्यात त्याला २० हजार रुपये मिळणार होते.
१४ ऑक्टोबर रोजी हसनैनने फोन करून सुमीत सहारे याने बँक खात्याशी संबंधित नोंदणीकृत सिम कार्ड काढून घेतल्याचे आणि खात्यात सुमारे ५४ लाख रुपये असल्याचे सांगितले. दरम्यान, रॉकी नावाच्या व्यक्तीने इकरा यांना व्हिडिओ कॉल करून त्यांचा भाऊ आणि त्याच्या मित्राला बंधक बनवल्याची माहिती दिली. दोघांना जिवंत जाळण्याची धमकी देत सुरुवातीला २८ लाख रुपयांची खंडणी मागितली. इकरा यांनी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने १५ लाख रुपयांची मागणी केली.
या प्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी नितीन वंजारी याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी असममधील चिरांग जिल्ह्यात शोधमोहीम राबवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही युवकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
दोन्ही युवकांना नागपूरला आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी रॉकीचा शोध सुरू असून पुढील तपास तहसील पोलिस करीत आहेत.



