नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात शुक्रवारी एका अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर मोठा दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने पांढऱ्या-राखाडी रंगाचा चेक्स असलेला फुल स्लीव्ह शर्ट परिधान केला होता. शर्टच्या कॉलरवर “SELECT” असे लिहिले आहे. तसेच त्याने निळ्या रंगाची जीन्स घातली असून तिच्या मागील खिशावर “DENIM” असे इंग्रजीत नमूद आहे.
घटनास्थळावरील परिस्थितीवरून मृताच्या डोक्यावर जड दगडाने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, अज्ञात मृताची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या तरुणाची ओळख किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





