नागपूर : शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिकारी बनून आलेल्या एका अनोळखी महिलेने महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील तब्बल ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाटतरोडी चौक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय महिला आपल्या घरी असताना अंदाजे ५० वर्षीय अनोळखी महिला तिच्या घरासमोर आली. तिने सुरुवातीला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर २० रुपये मागून महिलेची ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला.
काही वेळ बोलल्यानंतर आरोपी महिलेने गोड बोलून पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कथितरीत्या तिला भुलवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. पीडित महिलेने कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आरोपी महिलेच्या स्वाधीन केले. दागिने मिळताच आरोपी महिला ते घेऊन तेथून पसार झाली.
दरम्यान, काही वेळाने महिलेचे पती घरी परतले. त्यांनी दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही दागिन्यांची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपी महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.





