
नागपूर – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याने पुन्हा जोरदार पेट घेतला आहे. काँग्रेसने भाजपाला या मुद्यावरून कोंडीत पकडल्यानंतर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा नव्हे, भाजपाचाच अजेंडा आहे आणि आम्ही त्यावर सातत्याने काम करत आहोत”, असे स्पष्ट विधान बावनकुळे यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बावनकुळे म्हणाले,काँग्रेसकडे जनतेसमोर मांडण्यासारखा ठोस मुद्दा नाही म्हणून ते वेगळ्या विदर्भाचा विषय उकरून काढत आहेत. हा आमचा मुद्दा आहे, आमच्या अजेंड्यातून तो कधीच गेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून विदर्भाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.”
याउलट शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपाच्या भूमिकेला थेट विरोध केला. ते म्हणाले,
“राज्य वेगळे करून विकास होत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून काढणे महत्त्वाचे. सरकारमध्ये विदर्भातील अनेक मंत्री आहेत… त्यामुळे वेगळे राज्य करण्यापेक्षा विकासावर लक्ष केंद्रीत व्हायला हवे.”
दरम्यान, काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला सामाजिक न्यायाचा प्रश्न असल्याचे सांगत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला.
ते म्हणाले,मराठा समाजाचे राज्यसत्तेत प्राबल्य राहिले आहे; पण विदर्भातील दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र विदर्भ आवश्यक आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अधिवेशनानंतर काही आमदारांसह ते दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असून, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी मोहिम गतीमान करण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘वेगळा विदर्भ’ पुन्हा केंद्रस्थानी आला असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.









