नागपूर : सरत्या वर्षाला निरोप देत नागपुरात मोठ्या जल्लोषात 2025 या नववर्षांचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्ष, नव्या आशा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करण्यासाठी नागपूरकरांनी शहातील विविध मंदिरात गर्दी केली आहे.
सकाळपासूनच नागपुरातील जवळपास सर्वच मंदिरांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषत: रामटेक मंदिर, टेकडी गणेश मंदिर, साई मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. नववर्षानिमित्त मंदिरे रंगीबेरंगी दिव्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आली आहे.
अनेक भाविक कुटुंबीयांसह पूर्ण विधीपूर्वक पूजा करताना दिसले. यासोबतच अनेक मंदिरांमध्ये भजन-कीर्तन आणि विशेष आरतीचेही आयोजन करण्यात आले होते. नागपूरच नाही तर राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.