नागपूर: उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील विविध 35 प्रकारच्या कापडावरील कलाकृती सहभागी झाल्या होत्या.विणकरांनी तयार केलेल्या हातमागावरील कापडांच्या कलाकृतींना प्रोत्साहन मिळावे तसेच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वस्त्रोद्योग विभागातर्फे विभागीय स्तरावर हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येतात. नागपूर व अमरावती विभागातील स्पर्धेसाठी विणकरांनी सादर केलेल्या कापडांची निवड महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली.
प्रशासकीय इमारत क्रमांक 2 मधील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात विभागीय हातमाग कापड स्पर्धेतील विविध वस्त्रप्रकारांचे मान्यवरांच्या उपस्थितीत परिक्षण करून निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी ऑरगॅनिक कापड, मलबरी खादी, टसर खादी, टसर मुंगा, करवती साडी, करवती टसर चौकडा साडी, रेशिम प्लेन जरी बॉर्डर साडी, सहा वार कॉटन साडी, कोसा प्लेन कापड, टसर सिल्क दुपट्टा, टसर टेबल नॅचरल क्लॉथ, मर्सराईज घिचा प्लेन कापड, चिंधी दरी , नॉयलॉन चिंधी दरी आदी वस्त्र प्रकार स्पर्धेसाठी आले होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक यज्ञकुमार सुर्यवंशी, वस्त्रोद्योग शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख दीपक कुलकर्णी, वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक योगेशकुमार बाकरे, प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योगचे सहाय्यक संचालक अनंता निनावे, सहसंचालक सरिता मुऱ्हेकर तसेच वस्त्रोद्योग विभागाच्या अश्विनी नदाफ, अरुणा बुराडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम क्रमांकाचे 25 हजार रूपयांचे पारितोषिक दोन्ही कलाकारांना विभागून देण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे 20 हजार रूपयांचे पारितोषिक प्रविण मौंडेकर (नागपूर) यांना ‘कोसा पायल कापड’ तर गंगाधर गोखले (आंधळगाव, भंडारा) यांना ‘टसर टेबल नॅचरल शर्टींग कापड’ यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. तृतीय क्रमांकाचे 15हजार रूपयांचे पारितोषिक विभागून मोहम्मद कादीर महाजन(नागपूर)यांना ‘चिंधी कार्पेट’ यासाठी तर शालिक हेडावू (मोहाडी) यांना ‘मलबरी साडी’साठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. विभागातील विविध स्पर्धकांचे कापड यानंतर राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.
हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता तसेच विणकरांनी उत्पादित केलेल्या कापडाला बाजारपेठेत वाव मिळावा म्हणून विभागीय हातमाग कापड स्पर्धा योजना सन 1972 पासून सुरू करण्यात आली आहे. हातमाग कापड स्पर्धा विणकरांसाठी खुप महत्वपूर्ण आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांमध्ये निकोप स्पर्धा होवून त्यांना योग्य बाजार पेठ आणि व्यासपीठ निर्माण व्हायला मदत होते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केले.