
ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात, महात्मा फुले विद्यालयासमोर घडली. फिर्यादी निलेश पाठणसावंगीकर यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना सन्याल लोखंडे, शेखर धकाते आणि ददया बल्लू रोकडे हे तिघे तेथे आले. त्यांनी घराचे बांधकाम सुरू ठेवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा काम बंद पाडू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
यावेळी निवृत्त पोलिस कर्मचारी मनोहर पाठणसावंगीकर यांनी खंडणी कशासाठी, असा जाब विचारत विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि बेसबॉल बॅटने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या विशाल पाठणसावंगीकर यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचपावली पोलिसांनी मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.




