Published On : Tue, Jul 24th, 2018

नागपूर विद्यापीठ : ‘मॅनेजमेंट’वर मंचचा झेंडा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकांत शिक्षण मंचने बाजी मारली आहे. मंगळवारी विधीसभेच्या बैठकीत झालेल्या निवडणुकीत मंचचे आठही उमेदवार विजयी झाले. ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार होती. मात्र निवडणुकींचा वाद न्यायालयात गेला व त्यानंतर प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. अखेर न्यायालयाच्या निदेर्शानंतर मंगळवारी निवडणूक पार पडली.

विधिसभेच्या निवडणुकांमधील निकालांच्या आधारावर एकूण आठ सदस्य तेथून व्यवस्थापन परिषदेत निवडून गेले. अध्यापक गटातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.नितीन कोंगरे, प्राचार्य गटातून ‘व्हीजेएनटी’ प्रवगार्तून विजयी झालेले डॉ.चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन प्रतिनिधी गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.सुधीर फुलझेले व पदवीधर गटातून ‘एससी’ प्रवर्गातील विजयी उमेदवार दिनेश शेराम हे व्यवस्थापन परिषदेवर थेट गेले आहेत. विधीसभेतून उर्वरित चार जागांसाठी जोरदार चुरस होती.

महाआघाडीतर्फे शिक्षक गटात डॉ. प्रदीप बुटे, प्राचार्य गटात डॉ. मृत्यूंजयसिंग ठाकूर, व्यवस्थापन गटात किशोर उमाठे तर पदवीधर गटात अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी हे उमेदवार होते. तर विद्यापीठ शिक्षण मंचाकडून प्राचार्य गटात डॉ. ऊर्मिला डबीर, शिक्षक गटात डॉ. नीरंजन देशकर, व्यवस्थापन गटात डॉ.आर.जी. भोयर तर पदवीधर गटात विष्णू चांगदे हे निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र मतदारांचे पारडे हे शिक्षण मंचच्या बाजूनेच झुकले. मंचचे चारही उमेदवार यात विजयी झाले. प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली.

कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष
विधीसभेची बैठक सुरू झाल्यापासूनच शिक्षण मंच, अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठात जमले होते. सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसराच्या आत कार्यकर्त्यांना येता आले नाही. पार्किंगच्या जागेतच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोलताशे वाजून जोरदार जल्लोष केला.

आमदारांची पूर्णवेळ उपस्थिती
दरम्यान, विधीसभेचे सदस्य असलेले आमदार डॉ.मिलिंद माने,पंकज भोयर व नागो गाणार हेदेखील निवडणुकीला उपस्थित होते. ही निवडणूक भाजप व संघ वतुर्ळातील वरिष्ठ पातळीवरून गंभीरतेने घेण्यात आली होती. त्यामुळे हे दोघेही आमदार दिवसभर दीक्षांत सभागृहात उपस्थित होते.

नामनिर्देशन प्रक्रियेत मतदान
व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका आटोपल्यानंतर व्यवस्थापन व विधीसभेतील उमेदवारांचे विविध प्राधिकरणावर नामनिर्देशन करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेतून आर.जी.भोयर हे विद्यापरिषदेवर नामनिर्देशित करण्यात आले. तर तक्रार निवारण समितीवर शिक्षकेतर गटातून राजेंद्र पाठक हे नामनिर्देशित करण्यात आले. तर प्राचार्य, अध्यापक व पदवीधर प्रवगार्तून स्थायी समितीवर सदस्य नामनिर्देशनासाठी एकूण अधिक उमेदवार असल्याने मतदान झाले.

हे आहेत विजयी उमेदवार
प्राचार्य गट
खुला प्रवर्ग डॉ.ऊर्मिला डबीर
‘व्हीजेएनटी’ प्रवर्ग डॉ.चंदनसिंग रोटेले

अध्यापक व विद्यापीठ अध्यापक गट
खुला प्रवर्ग डॉ.नीरंजन देशकर
ओबीसी प्रवर्ग डॉ.नितीन कोंगरे

व्यवस्थापन प्रतिनिधी गट
खुला प्रवर्ग डॉ.राजेश भोयर
‘एससी’ प्रवर्ग डॉ.सुधीर फुलझेले

नोंदणीकृत पदवीधर गट
खुला प्रवर्ग विष्णू चांगदे
‘एसटी’ प्रवर्ग दिनेश शेराम