नागपूर : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नागपूर शहरातील तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागाने एकूण ९०.५२% निकालाचा टक्का मिळवला आहे, ज्यामुळे विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी त्यांची मेहनत आणि कामगिरी सिद्ध करत आपल्या शाळांना गौरविले आहे.
कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स या तिन्ही शाखांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवले आणि शहराच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवली आहे.
रुचिका भाकरे –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या रुचिका भाकरे हिने ९६.६७% गुण मिळवले आणि कॉमर्स शाखेत नागपूर शहरातून प्रथम क्रमांक मिळवला.
अमोघ गोतमारे – सायन्स शाखा
अमोघ गोतमारे याने ९५.१७% गुण मिळवले आणि सायन्स शाखेतून उत्कृष्ट यश मिळवले.
प्रीशा गुप्ता – कला शाखा
एलएडी कॉलेजची प्रीशा गुप्ता हिने ९४.५०% गुण मिळवले आणि कला शाखेत टॉप करून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या विद्यार्थ्यांनी आपली मेहनत, चिकाटी आणि समर्पण दाखवले असून, नागपूरचे शैक्षणिक मानक वाढवले आहेत. त्यांचे यश केवळ त्यांच्या शिक्षकांचे नाही, तर संपूर्ण नागपूरच्या शालेय व्यवस्थेचे गौरव आहे.
तर इम्तियाज गुलाल या नेत्रहीन विद्यार्थाला कला शाखेत ७१ टक्के गुण मिळाले. यासोबतच आयुषी मेहाडिया हिला कॉमर्स शाखेत ९४.६७ टक्के , रक्षा उईकेला ७१.४३ टक्के मिळाले आहे.
यंदा मुलींचा वरचष्मा-
यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली आहे. नागपूर विभागात एकूण ७४,२०४ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ६९,५७६ म्हणजेच ९३.७६% मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.४१% इतके आहे.
नागपूर विभागाचा निकाल –
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा नागपूर विभागाचा निकाल ९०.५२ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये नागपूर विभाग राज्यात खालून दुसऱ्या स्थानी म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के लागला होता, यंदा त्यात १.६० टक्क्यांची घसरण झाली आहे. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नागपूर विभागातून एकूण १ लाख ५२ हजार ४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार ११६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी (९०.५२ टक्के) उत्तीर्ण झाले. विभागातील निकालाच्या टक्केवारीत गोंदिया जिल्ह्याने ९४.०४ टक्के घेऊन अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याने ९३.४० टकके घेऊन विभागात दुसरा क्रमांक पटकावला.चंद्रपूर जिल्हा ८९.१७ टक्केसह तिसऱ्या क्रमांकावर, वर्धा ८७.७७ टक्केसह चौथ्या क्रमांकावर, भंडारा जिल्हा ८७.५८ टक्केसह पाचव्या क्रमांकावर तर गडचिरोली जिल्ह्याचा ८१.७७ टक्केसह सर्वात कमी निकाल राहिला.