नागपूर: नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला. हा भाजपसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचलं आहे. ‘भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी’. असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.
कोणाला किती मतदान
पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना एकूण 14069 मतं पडली आहेत. तर भाजपचे नागो गाणार यांना 6366 मत पडली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजेंद्र झाडे यांना 2742 मत पडली आहेत. नागपुरात सुधाकर आडबाले, नागो गाणार आणि राजेंद्र झाडे यांच्यामध्ये लढत होती. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत.