नागपूर: शहरातील वासुदेव नगर मेट्रो स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगाने धावणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या पोहेवाल्याच्या दुकानात घुसल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास घडली. भरधाव कार अचानक नियंत्रण सुटून रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये घुसली. कारचा वेग इतका प्रचंड होता की दुकानाबाहेरील लोखंडी खांब, शेड आणि इतर लोखंडी साहित्यही वाकले.
सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने दुकान परिसरात कोणतीही गर्दी नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शहरात मध्यरात्री काही तरुण भरधाव वेगाने महागड्या कारमधून रेसिंग करत असल्याची चर्चा नेहमीच होत असते. त्यामुळे हा अपघातही अशाच प्रकारच्या कथित स्ट्रीट रेसिंगमुळे झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.





