
नागपूर : स्पा सेंटर आणि पंचकर्म मसाजच्या नावाखाली कथित देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने (एएचटीयू) कोतवालनगर येथील ‘अवीरा पंचकर्म अँड स्पा’वर छापा टाकून तीन युवतींची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खातरजमा करून १२ ऑक्टोबर रोजी संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला.
पोलिसांच्या माहितीनुसार, राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतवालनगर येथील कांता पॅलेसमधील फ्लॅट क्रमांक २०० मध्ये हे स्पा सेंटर सुरू होते. आर्थिक लाभासाठी युवतींना कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून कथित देहव्यापारात ढकलले जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी योगेश अशोकराव इंगोले (३५, रा. गीतानगर, मानेवाडा-बेसा) आणि सुप्रिया राजू रायकवार (३५, रा. भूपेश नगर, बोरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२), १४३(३) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत कारवाई केली आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग आणि एएचटीयूच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास राणा प्रतापनगर पोलीस करीत आहेत. स्पा सेंटरमधील कथित गैरप्रकार किती काळापासून सुरू होते आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.



