नागपूर : राज्यात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालक (DGP) इन्सिग्निया पदकाने गौरवण्यात येते. यंदा राज्यभरातून एकूण ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात येणार आहे. नागपूरमधून या यादीत विशेष योगदानासाठी २२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये नक्षलविरोधी विशेष कृती दलाचे एसपी संदीप पखाले यांचे नाव आघाडीवर आहे.
एसपी संदीप पखाले यांना यापूर्वीही, २०१२ साली डीजी पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि नक्षलग्रस्त भागात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत SRPF ग्रुप क्रमांक ४ चे उपअधीक्षक दादा ईश्वरकर यांनाही यावर्षी डीजी पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
नागपूर शहर पोलिस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही यंदा या सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाबूराव राऊत, जुनी कामठीचे ठाणेदार महेश आंधळे, गणेशपेठचे ठाणेदार मच्छिंद्र पंडित आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कैलाश बाराभाई यांचा समावेश आहे.
तसेच, शहर पोलिस दलातील पीएसआय सुरेंद्र सिरसाठ, एएसआय प्रमोद चौधरी, प्रशांत लाडे, राजेश क्षिरसागर आणि नरेंद्र दुबे यांनाही डीजी पदक देण्यात येणार आहे.
पोलिस विभागात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मंजीतसिंह बहादूर, हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबालकर, महेश कुरसुंगे, जितेंद्र तिवारी, रणजीत गवई, सचिन ठोंबरे आणि रजनी नागुलवार यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
महिला पोलीस कर्मचारी पूजा माणिकपुरी ह्या देखील पदक प्राप्त करणाऱ्या यादीत सामील आहेत. याशिवाय, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे हेड कॉन्स्टेबल ताहिर हुसेन अब्दुल जलील आणि यूओटीसीचे एएसआय नौशाद अली हैदर अली यांनाही डीजी पदकाने गौरवले जाणार आहे.
हे पदक पोलिस खात्यातील कर्तव्यनिष्ठा, निडर सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन दिले जात असल्याने या सन्मानामुळे नागपूर पोलिस दलाची प्रतिमा उजळली आहे.